Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न झाल्याने घोडाझरी धरणातील जलसाठा अत्यंत खालावला होता. धरणाचा तळ उघडा पडण्याची वेळ आल्याने शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गत २ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून जलपातळीत झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी आशादायक मानली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी ३० जुलैलाच घोडाझरी धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यावेळी सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. (फोटो सौजन्य – AI Created)
पाण्याचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली होती. मात्र, यंदा त्याच कालावधीत धरणात तुलनेने अत्यल्प पाणीसाठा असल्याने गतवर्षाच्या तुलनेत पावसाची स्थिती किती बदलली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. घोडाझरी धरण हे परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचे जलस्रोत असून त्यावर अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आधार आहे. पाण्याची वाढ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे.
पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून कोसळणारे पाणी आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. यंदा धरणातील कमी जलसाठ्यामुळे पर्यटनावरही परिणाम झाला आहे. आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठा वाढून परिसराला पुन्हा निसर्गसौंदर्याची झळाळी मिळण्याची शक्यता आहे. तथापि, दोन दिवसाच्या पावसाने घोडाझरी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अपेक्षित पावसाअभावी शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. गतवर्षी ३० जुलैलाच ओव्हरफ्लो झालेले धरण यंदा झिरो पॉईंट धरून ११.२ फूट पाण्यावर आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी दमदार पावसाची गरज आहे.
घोडाझरी धरणात किमान १५ ते १६ फूट पाणीसाठा उपलब्ध झाल्यासच पिकांना पुरेसा आधार मिळू शकतो आणि शेतीतून समाधानकारक उत्पादन निघण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या झिरो पॉईंट धरून ११.२ फूट पाणी असले तरी शेतकऱ्यांची चिंता अद्याप पूर्णपणे दूर झालेली नाही. सध्या उपलब्ध जलसाठ्यापेक्षा आणखी चार ते पाच फूट पाण्याची वाढ होणे गरजेचे आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काळात धरणाच्या जलपातळीत आणखी वाढ होऊन १५ ते १६ फुटांचा आवश्यक टप्पा गाठता येईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत. घोडाझरी धरणाला पर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे.






