Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
शुक्रवारी शाळेत शिक्षक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्या दिवशी शाळा सकाळच्या वेळेत सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, संमेलनाच्या एक दिवस आधी केंद्रप्रमुखांकडून शिक्षक संमेलन रद्द करण्यात आले. ही माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना वेळेत मिळाली नसल्याने सकाळच्या सत्रातील शाळेसाठी सुमारे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शाळेत सकाळच्या वेळेत शालेय पोषण आहार सुद्धा तयार करण्यात आले. मात्र त्यावेळी शाळेत एकही शिक्षक उपस्थित नव्हते त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तसेच संबंधित शिक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शिक्षक अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीमुळे पालकांचा गोधळ निर्माण झाला. (फोटो सौजन्य – AI Created)
दरम्यान, सकाळी सुमारे ९ वाजता शिक्षक शाळेत दाखल झाले. जे विध्यार्थी सकाळी आले त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पुढे नियमित वेळेनुसार सकाळी १० वाजता शाळेचे कामकाज सुरळीतपणे सुरू करण्यात आले. काही दिवसांपूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चारही शिक्षक अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविना शाळेत यावे लागले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांची चौकशी सुरू केली.
या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा गोंडपिपरीतील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत शिक्षकांच्या अनुपस्थितीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकाच तालुक्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शाळांमधील शिक्षक उपस्थिती, प्रशासकीय समन्वय आणि शिक्षण विभागाच्च्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संमेलन रद्द झाल्याची माहिती वेळेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असती, तर हा प्रकार टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी
शिक्षक संमेलन रद्द झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. परंतु काही विद्यार्थी लवकर घरी गेल्याने काही विद्यार्थ्यांना माहिती मिळाली नाही. ते सकाळी शाळेत आले. -अंकुश कुळमेथे, मुख्याध्यापक, जि.प. मुलींची शाळा, गोंडपिपरी
काही विद्यार्थ्यांचा गैरसमज झाल्याने ते शाळेत आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सोमवारी मी स्वतः शाळेला भेट देऊन संपूर्ण वस्तुस्थितीची चौकशी करणार असून, त्यानंतर योग्य ती कार्यवाही करणार – वैभव खांडरे, विस्तार अधिकारी (शिक्षण), पंचायत समिती, गोंडपिपरी






