Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी
शुक्रवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेत ‘रिफॉर्म उत्सव’, ‘पीपल्स प्लॅन कॅम्पेन’ (पीपीसी), विकसित भारत २०४७ तसेच महिला शेतकरी सक्षमीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – AI Created)
विशेषतः महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या उपाययोजना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्यांची भूमिका यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, सभेच्या आयोजनाबाबतच स्पष्टता नसल्याने विषयपत्रिकेतील मुद्द्यांवर प्रत्यक्ष चर्चा झाली का, ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडले का आणि त्यावर काही निर्णय घेण्यात आले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतरही ग्रामसभेच्या प्रत्यक्ष आयोजनाबाबतचा संभ्रम कायम आहे. नोटीस काढण्यापासून ग्रामसभेचे कामकाज पार पाडण्यापर्यंतची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत ग्रामस्थांकडून स्पष्टता मागितली जात आहे.
ग्रामपंचायत अधिकारी कवडू तराळे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभेची नोटीस वेळेवर काढण्यात आल्याचे सांगितले. आपल्याला केवळ नोटीस काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तर प्रत्यक्ष ग्रामसभा घेण्याची जबाबदारी सरपंचांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, सरपंच प्रियंका कोलते यांनी नोटीस वेळेवर काढण्यात आल्यामुळे त्यावर आपण स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले. तसेच प्रकृती अस्वस्थ असल्याने ग्रामसभेला उपस्थित राहता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गावाच्या विकासाचे निर्णय, नागरिकांच्या समस्या आणि शासनाच्या विविध योजनांबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. अशा परिस्थितीत विशेष ग्रामसभेची नोटीस काढूनही प्रत्यक्ष कामकाजाबाबत स्पष्टता नसेल, तर ग्रामस्थांच्या अपेक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विषयपत्रिकेत महिला शेतकरी सक्षमीकरणासारखा महत्त्वाचा मुद्दा असताना त्यावर प्रत्यक्ष चर्चा झाली का, याची अधिकृत माहिती ग्रामस्थांना मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का आणि ग्रामसभेच्या आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
विशेष ग्रामसभेची नोटीस वेळेवर काढण्यात आल्यामुळे मी त्यावर सही केलेली नाही. त्यातच माझी तब्येतही बरी नसल्याने मला ग्रामसभेला उपस्थित राहता आले नाही.- प्रियंका कोलते, सरपंच, खडसंगी
वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभेची नोटीस वेळेत काढण्यात आली होती. आम्हाला केवळ ग्रामसभा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ग्रामसभा घेण्याची जबाबदारी सरपंचांची होती. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचे काम सरपंचानी करणे अपेक्षित होते. – कवडू तराळे, ग्रामपंचायत अधिकारी, खडसंगी






