Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन टस्कर हत्ती नदी ओलांडून जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. हत्तींचा संभाव्य मार्ग निश्चित करून त्या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले. सामदा बुज येथील दागोबा देवस्थान परिसरातून पुढे जात हत्ती वाघोली बुट्टी आणि व्याहाड बुज परिसरातून जंगलात पोहोचले. या भागात सध्या शेतांमध्ये धान पीक रोवण्याचा हंगाम असून अनेकांनी आवत्या टाकलेले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हत्तींच्या वजनामुळे धानाची पिके तुडवली गेली असून काही ठिकाणी पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हत्तींच्या भ्रमंतीमुळे सामदा, वाघोली आणि व्याहाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक बाधित झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या रोवणीचा हंगाम सुरू असून धान लागवड केलेल्या शेतात वारंवार हत्ती येऊन पिकांचे नुकसान करीत आहेत, दीड महिन्यापूर्वीही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले होती. आता पुन्हा हत्ती परत आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि तुटपुंजी मिळणारी नुकसानभरपाई वाढवून प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्यात यावी. – भाऊराव कोठारे, कापसी
निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश
हत्तीचा मुक्काम सध्या साखरी सिर्सी जंगल परिसरात आहे. दरम्यान प्रवासात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. भ्रमंती मार्गातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येणार आहे. एखादा शेतकरी सुटल्यास त्यांनी वनविभागाकडे लेखी अर्ज करावा. हत्तीच्या देखरेखीसाठी रात्रीच्या सुमारास २० कर्मचाऱ्यांचे पथक तर दिवसा १० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे.- विनोद धुर्वे, वनपरीक्षेत्र अधिकारी, सावली






