नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. निकालामध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे हिरमोड झाला आहे. या राज्यातील निकालाचा फटका केंद्रामध्ये देखील बसला आहे. महायुतीला राज्यामध्ये फक्त 17 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत.त्यामध्ये भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यानंतर आज देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद करणे टाळले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यनांशी संवाद साधला असून महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
फडणवीस यांना समजवण्याचा प्रयत्न चालू
निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्याची मागणी करत वरिष्ठांची चर्चा करणार असल्याचे सांगितले. यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पूर्ण पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. सर्व मंत्री, कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. तसेच फडणवीस यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. सर्वांनी त्यांना गळ घातली आहे की त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीने जातपात धर्माचे राजकारण केलं
तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, उद्या बैठकीनंतर मोदी पंतप्रधान झालेले दिसतील व केव्हाही शपथविधी होईल. पुन्हा एकदा मजबूत सरकार भारताला मिळेल. महाविकास आघाडी कधीच विकास करु शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत फक्त महायुती करु शकते. महायुती पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करेल. राज्यात नेरेटीव्ह सेट करण्यात आला होता. जे राजकारण सेट झालं जातपात धर्माचे त्यामुळे हे झाले आहे. महाविकास आघाडीने केलेले जातीपातीचे पाप केले हे काही काळापुरते आहे. हे पाप धुऊन निघेल व महायुतीच्या मागे लोकं उभी राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.