नाशिक : राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल देखील केला. अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्यामुळे पक्षातील एक गट नाराज असल्याची चर्चा होती. या उमेदवारीमुळे छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर आता छगन भुजबळ यांनी स्वःत स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार यांची चूक नाही
मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यसभेबाबत मत व्यक्त केले. मंत्री भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी पक्षातील कोर कमिटीचे सदस्य आणि खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार सुनील तटकरे यांच्यासह चर्चा करुन राज्यसभा उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात आला. ही बैठक काल पार पडली आणि सर्वांच्या मते सुनेत्रा पवार यांचे उमेदवारीसाठी नाव ठरवण्यात आले. असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवार हे घरातील लोकांना संधी देत आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर छगन भुजबळ म्हणाले, यामध्ये अजित पवार यांची काय चूक आहे. निर्णय काय फक्त अजित पवार यांनी घेतलेला नाही. निर्णय सर्व कमिटीने बैठकीमध्ये घेतला आहे. त्यामध्ये अजित पवार यांना बोलण्यामध्ये काय अर्थ आहे?, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होतेच असं नाही
छगन भुजबऴ .यांना ते नाराज आहेत का असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी माझ्या तोंडावरुन मी नाराज वाटत आहे का असा प्रतिसवाल केला. भुजबळ म्हणाले, राज्यसभेसाठी मी देखील इच्छुक होतो. माझ्याप्रमाणे आणखी 4 ते 5 जण इच्छुक होती. मात्र बैठकीमध्ये सर्व चर्चेअंती सुनेत्रा पवार यांचं नावं निश्चित करण्यात आलं. त्यामुळे मी नाराज वैगरे काही नाही. आणि ठीक आहे. पक्षामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन व चर्चा करुऩ निर्णय घ्यायचे असतात. 57 वर्षांपासून हेच करत आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होतेच असं नाही, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.