विशेषतः ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्यांचा वापर वाढवला आहे. परिणामी शहरातील वीज यंत्रणेवर अचानक वाढलेला भार सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी वारंवार वीज खंडित होत आहे. या परिस्थितीमुळे महावितरणच्या कामकाजाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाथ षष्टी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले होते. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, शासन तसेच इंडेन कंपनीकडून कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने शहरातील हॉटेल व्यवसायावरही संकट ओढवले आहे. अनेक हॉटेल चालकांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येत आहे. परिणामी हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवरही उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि वीजपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकां कडून करण्यात येत आहे.






