छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 (फोटो - सोशल मीडिया)
प्रिती माने : इतिहासामध्ये अशी काही व्यक्तीमत्त्वे असतात ज्यांच्याशिवाय इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. हीच माणसं इतिहास घडवतात, जगतात आणि निर्माण करतात. वर्षानुवर्ष आणि समाजाच्या मनी आणि जनांच्या मुखी त्यांच्या शौर्याच्या अन् कार्याच्या ओव्या गायल्या जातात. असेच एक झंझावत इतिहास निर्माण करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या नावामधील ताकद आणि प्रेरणा काही औरच आहे. साडेतीनशे वर्षांनंतरही या नावाचे वादळ महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत घोंघावत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्यास घेत आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. रयतेच्या सुखाचे राज्य निर्माण करताना आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातले. सुख समृद्धीचे राज्य…सुराज्य असे छत्रपतींचे स्वराज्य ‘न भूतो न भविष्यती’ असे आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे आणि राजघराणी होऊन गेली. या राजांनी सुखविलासी आयुष्य जगले. मात्र रयतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणारा जगाच्या पाठीवरील ‘जाणता राजा’ हा एकच झाला. रयतेचे अश्रू पुसरणारे आणि न सांगताही त्याचा अर्थ उलघडणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
आईच्या गर्भात असल्यापासून संस्कारांची शिदोरी शिवरायांना मिळाली होती. राजमाता जिजाऊंच्या मांडीवर खेळत असल्यापासून त्यांना समाजातील अन्यायाच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आया बहिणींवरील अत्याचार, जबरदस्तीचा शेतसारा अन् गाढवाचा नांगर फिरवून महाराष्ट्राची केलेली दुर्दशा…याची जाणीव शिवरायांच्या बालमनाला होती. खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये शंभू महादेवाला रक्ताभिषेक करुन स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला. वयाच्या 14 व्या वर्षी ध्येय ठरवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आजच्या तरुणाईने देखील घ्यावी. आयुष्याचे ध्येय ठरवून त्या दिशेने यथाशक्ती प्रयत्न करण्याची प्रेरणा शिवरायांकडून घेण्यासारखी आहे.
जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ
पुण्यासारख्या समृद्ध शहरामध्ये मुरार जगदेव याने अशुभ संकेत देण्यासाठी गाढवाचा नांगर फिरवला. भाबड्या शेतकऱ्यांच्या मनात भीती आणि राजकीय संकेत देत हा प्रकार घडवण्यात आला होता. मात्र राजमाता जिजाऊ आणि शिवरायांनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. लोकांच्या मनातील भीती काढून टाकली. तरुण वयात तोरणा किल्ला घेत स्वराज्याचे ‘तोरण’ बांधले. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची घौडदौड अविरतपणे सुरु राहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दुजाभावाला धारा नव्हता. स्वतः शिवरायांनी कधीही जात- पात आणि धर्मामध्ये भेद केला नाही. माणूसकीची नाळ शिवरायांनी त्यांच्या प्रत्येक सवंगड्याशी, मावळ्यांशी आणि रयतेशी जोडून ठेवली. कोणत्याही व्यक्तीचे कौशल्य आणि चातुर्य ध्यानी घेत त्यांनी कार्य सोपवले. लोकांच्या मनामध्ये स्वरक्षण आणि स्वतःच्या मातीचे रक्षण या विचारांची बीजे पेरले. आजही मनामनामध्ये त्याचे अंकुर दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार देत रयेतच्या मनात स्वराज्याप्रती प्रेमभावना निर्माण केली. लोकांच्या मनातील भेदभावाची जळमटं काढून टाकत जातीपातीच्या भिंती मोडून टाकल्या. आजच्या तरुणाईने देखील शिवरायांचा हा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. जातीपातींमध्ये भेदभावाचा विचार न करता राष्ट्रनिर्मितीचे आणि राष्ट्राच्या प्रगतीचे कार्य सुरु ठेवले पाहिजे.
chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही धर्माचा कधीही दुस्वास केला नाही. स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगताना त्यांनी नेहमी इतरांचा आदर केला. धर्मासह भाषेवर होणारी आक्रमणे देखील त्यांनी थोपवली. स्वराज्याच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेला प्रथम स्थान दिले. मराठी भाषेवर ‘फारसी’ भाषेचे वाढते प्रभुत्व रोखण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले. अनेक मराठी शब्द आणि शब्दप्रयोग व्यवहारामध्ये आणले. साहित्य निर्मिती करणाऱ्या संताप्रती गुरुभावना ठेवली. संतांच्या वारीला अभय आणि सुरक्षा दिली. समाजाचा बहुअंगी विकास करण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दृष्टीकोनातून आजचा विकास आऱाखडा तयार करण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ही त्यांच्यातील वेगळेपण आजही सिद्ध करते. सह्याद्रीच्या पर्वतांवर त्यांनी भरभक्कम असे किल्ले, राजकोट आणि गडांचे बांधकाम केले. तसेच समुद्रामार्गी येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी त्यांनी नौदलाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील पहिले आरमार दल उभारणारे म्हणून ओळखले जातात. समुद्राच्या पाण्यावरही सत्ता असणाऱ्याचे वर्चस्व असणार आहे ही बाब शिवरायांनी हेरली होती. ‘छाती केसरीची दृष्टी गरुडा’ची म्हणतात असं उगाच नाही. शत्रूचा पुढचा डाव ओळखून आधीच रणनीती आखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या जगात प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. आज शिवरायांची 395 वी जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये संस्कृतीचे दर्शन घडवत जयंती साजरी केली जात आहे. या माध्यमातून शिवरायांच्या कार्याला वंदन आणि त्यांना नमन केले जात आहे.