डोंबिवली :डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी एमएमआरडीए आणि केडीएमसीने पुलाचे आरेखन बदलले आहे. हे दहावे आश्चर्य पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या , असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नाही. हे राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे सत्ताधाऱ्यांना सांगितले आहे. आत्ता याचा काय परिमाण होतो हे येणारा काळ ठरवणार आहे. खरेच एमएमआरडीए, केडीएमसी आणि मुख्यमंत्री या मागणीची दखल घेणार का?
कल्याण शीळ मार्गावर पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पलावा जंक्शन येथे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. हे काम मंद गतीने सुरु आहे. या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पूलाच्या कामाची पाहणी केली होती. पूलाचे काम मंद गतीने सुरु असल्याने एमएमआरडीएच्या अधिकारी वर्गाला चांगले झापले होते.
दादर येथील टिळक पुलाचे काम करताना रेल्वे आणि एमएमआरडीए या दोन यंत्रणांनी पुलाचा एका पिलरचा स्पॅम ८१ वर्षे जुन्या असलेल्या विष्णू निवास इमारतीला खेटून बांधला आहे. हे जगातले नववे आश्चर्य आहे. मग दहावे आश्चर्य आमच्या डोंबिवलीत आहे. एमएमआरडीए आणि केडीएमसीच्या कृपेने आम्हीपण या विक्रमाचे मानकरीत आहोत. खरं वाटत नसेल तर डीपी रस्त्यातील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी पुलाचे आरेखन बदलून एमएमआरडीए आणि केडीएमसीन केलेली करामत पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.