जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने फरफट
डिजिटल भारताच्या संकल्पनेअंतर्गत नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, सोमवारी केंद्र शासनाच्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रणालीचा सव्र्व्हर बंद पडल्याने सोलापूरसह राज्यातील अनेक महापालिकांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. ‘सिस्टम अपडेट’ सुरू असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, दिवसभर सेवा पूर्ववत न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.(फोटो सौजन्य – AI)
सोलापूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाबाहेर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. जन्म दाखला, मृत्यू दाखला, नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना ‘सव्र्व्हर डाऊन’ असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेकांना निराश होऊन माघारी परतावे लागले, तर काहींनी सेवा सुरू होईल या आशेने दिवसभर कार्यालयाबाहेर प्रतीक्षा केली.
केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील जन्म मृत्यू नोंदणीच्या केंद्रीय सॉफ्टवेअरवर देशभरातील नोंदणी प्रक्रिया अवलंबून आहे. त्यामुळे सर्व्हर बंद पडताच संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. दिवसभरात एकाही जन्म किंवा मृत्यूची नोंदणी होऊ शकली नाही. तसेच दाखला वितरण आणि दुरुस्तीची कामेही रखडली. या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांसह संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, सर्व्हर बंद राहणार असल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. परिणामी, दूरवरून आलेल्या नागरिकांना फटका बसत आहे.
केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक डिजिटल प्रणाली’ या संकल्पनेला तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसल्याचे सोमवारी दिसून आले. एका केंद्रीय सर्व्हरमधील बिघाडामुळे राज्यभरातील जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्था ठप्प झाली. डिजिटल सेवांची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी सर्व्हर, बॅकअप यंत्रणा आणि पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.






