संग्रहित फोटो
पुणे : आता नागरिकांना आपल्या तक्रारी आठवडयातून दोन वेळा आणि त्यासुद्धा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या समोर मांडता येणार आहेत. महापालिका निवडणूका रखडल्याने मागील तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना दैनंदिन भेडसावणाऱ्या तक्रारी मांडण्यासाठी महापालिकेत गेल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत होती. महापालिकेच्या जुन्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीचे रूपांतर तक्रार निवारण कक्षात करण्यात आले आहे.
दरम्यान या ठिकाणी सोमवार व गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागरिकांना भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकून तक्रारींचे निवारण करणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी या कक्षाची पहाणी केली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यावेळी उपस्थित होते.
एकाच वेळी दिडशे नागारिकांना बसण्याची सुविधा
आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, अनेक नागरिक दररोज महापालिका भवनमध्ये येत असतात. त्यातील अनेकांना महापालिका आयुक्तांना भेटायचे असते. सोमवार आणि गुरुवार या आयुक्तांच्या भेटीच्या दिवशी चौथ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर मोठी गर्दी असते. त्यामुळे काहींना आयुक्तांच्या भेटीविनाच परतावे लागते.
तर अनेकांना विभागप्रमुखांकडे तक्रार करूनही आमची समस्या सुटत नसल्याची तक्रार करायची असते. परंतु, आयुक्तांची भेट न झाल्यास आपली समस्या ऐकून घेतली जात नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन हा तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच वेळी दिडशे नागारिकांना बसण्याची सुविधा आहे. तसेच महापालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त स्वत: या तक्रारी ऐकून घेतील.