महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा (HSC Exam) उद्यापासून म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary Higher Secondary Education) काही नियमावली जाहीर केली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात आले आहेत. आणि त्यासोबतच परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
राज्यामध्ये परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखा : ७, ६०, ०४६, कला शाखा : ३, ८१, ९८२, वाणिज्य: ३, २९, ९०५, वोकेशनल : ३७, २२६ आणि आय टी आय : ४७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी बोर्डाकडून घेण्यात येणार आहे. नियमित, खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह श्रेणीसुधार योजनेअंतर्गत, आयटीआय आणि पुनर्परीक्षार्थी अशा एकूण बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या ५६ हजार ६१६ ने वाढली आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा आयोजित केली आहे. राज्यातील १० हजार ४९६ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यात तीन हजार ३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.