“मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही.”, मनोज जरांगेंच्या टीकेला CM फडणवीसांचं प्रत्युत्तर
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीबाबत सरकारने अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौऱ्यावर असताना, “आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. पण आता कळेल की आरक्षण देतात की नाही”, असं त्यांना म्हटलं आहे.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेल किंवा एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील, आमच्या भूमिकेत कोणतंही अंतर नाही. जे निर्णय आम्ही घेतले ते तिघांनी मिळून घेतले. यापुढेही जे निर्णय होतील ते आम्ही तिघेजण मिळून घेऊ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संपल्यानंतर मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे देत नाहीत आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न कसा मार्गी लागत नाही? तेही मी पाहतो. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे दोन कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आतापर्यंत आरक्षणामध्ये गेला. आता येत्या २५ जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. उपोषण मला किती सहन होईल हे मला माहिती नाही. पण मी माझ्या समाजासाठी मरायलाही तयार आहे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“आता काहीजण म्हणत आहेत की, तेच (महायुतीचं) सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. मग आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आता होऊ द्या, कारण आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. मी मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, मी तर आरक्षण द्या म्हणतो, असं म्हणायचे. मग आता समजेल की ते (देवेंद्र फडणवीस) मराठा आरक्षण देतात की नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नाही. मात्र, त्यांच्या विधानाचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता, अशी चर्चा रंगली आहे.