वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांची सून असलेल्या वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. कौटुंबिक जाच आणि हुंडा मागत राहिल्यामुळे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणालातील हगवणे कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचे असल्यामुळे या घटनेला राजकीय वळण लागले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी आहे. एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. त्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण वैष्णवीच बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मी स्वतः पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना याबाबत सांगितलं. यामध्य पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे. बाळ सुखरुप राहण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे,” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “वैष्णवीची आई किंवा तिच्या माहेरकडच्यांना बाळ सूपूर्द करण्यात आले आहे. वैष्णवीच्या शरिरावर मारहाणीचे अनेक व्रण आहेत. त्यामुळे ही हत्या नसून ही हत्या असल्याचा आरोप कस्पटे परिवार करत आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे, त्याच पद्धतीने या प्रकरणाची चौकशी केली जाईल. हे सगळे व्रण, तिचे ऑडिओ क्लिप, यामागे असणारं संभाषण, वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी दिलेली माहिती या सगळ्या गोष्टींवर आधारित ही चौकशी केली जाणार आहे,” अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील कास्पटे परिवाराची भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हगवणे कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं पाठबळ देण्यात आलेलं नाही. आरोपींच्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुस्क्या आवळल्या जातील. अजित पवार यांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे की हगवणे यांना कोणताही राजकीय पाठबळ दिलेले नाही. आम्ही देखील आता आई म्हणून इथे आलो आहोत,” असे मत रुपाली पाटील यांनी व्यक्त केले आहे.
वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यांचा फॉरच्युनर गाडीची चावी देताना फोटो देखील व्हायरल झाला आहे. याबाबत बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “हगवणे परिवाराला कोणतही राजकीय पाठबळ नाही हे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. लग्न समारंभामध्ये राजकीय नेत्यांना बोलावणे आणि निमंत्रित केले जाते. प्रत्येकजण बोलवतात. परंतू त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी होतात या नेत्यांवर किंवा आलेल्या पाहुण्यांवर लादू शकत नाही. या हुंडाबळीला राजकीय पाठबळ असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे, मत राष्ट्रवादी रुपाली पाटील ठोंबरे यांनी अधोरेखित केले आहे.