मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठी खळबळ सुरु झाली आहे. निकालामध्ये भाजपला अपेक्षित यस न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. सगळ्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पक्षाकडे विनंती करणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले,“भाजपाला महाराष्ट्रात ज्या परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या त्या सगळ्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे”, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली. “निवडणुकीत हार-जीत होत असते. त्याने खचून जाता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता काही लोक मोदी हटाव, मोदी हटाव असे म्हणत असले तरी जनतेने एनडीएच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.