Photo credit- Social media विधान परिषदेत नेतृत्व करण्यासाठी फडणवीसांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये स्पर्धा तीव्र
मुंबई: विधान परिषदेतील प्रमुख नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अनिल परब यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व केले. मात्र, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घोषणाबाजी करत आंदोलन ताब्यात घेतले आणि सकाळपासूनच आपला आक्रमक आवाज घुमवला. यामुळे विधान परिषदेत भाजपच्या नेतृत्वावर नव्या चर्चेला उधाण आले आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्यात नेतृत्वासाठी चुरस सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्या पुढे येतील का? याकडे आता भाजप कार्यकर्त्यांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत भाजपची मजबूत ताकद असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील आणि सत्ताकांक्षी नेत्यांना विधान परिषदेत स्थान दिले आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाशिव खोत, श्रीकांत भारती, परिणय फुके आणि निरंजन डावखरे यांसारखे नवे-जुने नेते पक्षात सक्रिय आहेत.
या नेत्यांमध्ये विधान परिषदेत प्रभावी नेतृत्वासाठी चुरस सुरू आहे. फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे प्रवीण दरेकर हे सध्या परिषदेतील प्रमुख चेहरा मानले जात असले तरी, भविष्यात या नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा दिसून येऊ शकते. विशेषतः प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात राजकीय वर्चस्वासाठी टशन पाहायला मिळते. यामुळे, विधान परिषदेत भविष्यात भाजपच्या नेतृत्वाची दिशा कोण ठरवणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत आमदार झाल्यानंतर काही महिन्यांतच चित्रा वाघ यांनी आपली ओळख आक्रमक नेत्या म्हणून प्रस्थापित केली आहे. भाजपच्या संघटनेत त्यांचा मोठा प्रभाव असून, सत्तेचा भाग असो वा नसो, त्या विरोधकांवर कठोर शब्दांत टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून ते मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत, त्यांनी आपल्या आक्रमक शैलीने छाप पाडली आहे. सभागृहातील चर्चांमध्ये त्या प्रखरपणे सहभागी होत असून, त्यांचा दबदबा स्पष्टपणे जाणवत आहे.
लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! महिला दिनी मिळणार दोन महिन्यांचे पैसे, महायुती सरकारची घोषणा
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला, त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. यानंतर, शुक्रवारी सत्ताधारी पक्षाने विधानसभेच्या पायऱ्यांवर परब यांच्या विरोधात आंदोलन केले. यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विधान परिषदेत चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका अधोरेखित झाली आहे.