राज्यपाल अभिभाषण आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिवसेना अनिल परब यांचे वादग्रस्त विधान केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. येत्या 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. तर आज अहवाल सादर होणार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेत्यांच्या वादग्रस्त विधाने आणि आरोप प्रत्यारोपांमुळे चर्चेमध्ये आले आहे. नेत्यांमधील वादंगमुळे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये गदारोळ सुरु आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे आमदार अनिल परब हे चर्चेमध्ये आले आहेत. अनिल परब यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांच्या टीकेचा स्तर खालावला आहे. यामुळे आता सत्ताधारी आमदारांनी त्यांना घेरले आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे राज्यपाल … यांच्या अभिभाषणावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी त्यांच्यावरील ईडी कारवाईची माहिती देताना छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केली आहे. यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वामध्ये विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच आमदार अनिल परब यांनी माफी देखील मागवी अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध करताना भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, “अनिल परब यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजांशी केलेली आहे. त्याच्या या विकृत मानसिकतेचा आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या परबांचा आम्ही धिक्कार करतो. काल सभागृहात बोलले छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय, असं बोलून त्यांनी छत्रपती महाराजांशी तुलना केली,” असे मत प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे प्रवीण दरेकर म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाच्या नखांशी देखील त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही शिवभक्तांनी अनिल परब यांचा धिक्कार केला आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल सभागृहात जाहीर माफी मागावी, अनिल परब याचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे, अबू आझमीप्रमाणे अनिल परब यांच्या निलंबनासाठी 100 टक्के आग्रही आहोत. नाक्यावरची भाषा सभागृहात बोलून चालणार नाही,” असे स्पष्ट मत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे .
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते अनिल परब?
सभागृहामध्ये बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले की, “संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स… चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अन्याय आणि अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे. राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात,” अशा खालच्या स्तरावरील शब्दांमध्ये अनिल परब यांनी टीका केली आहे.