सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून, ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भेट देणार आहे.
काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, नांदेड दक्षिण ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश उपाध्यक्ष यशपाल भिंगे, सरचिटणीस डॉ. दिनेश नखाते, ऍड सुरेंद्र घोडजकर, श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण व सचिव धनराज राठोड यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल आणि काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेल.
यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
सलग चार दिवसांचा मुसळधार पाऊस आणि ईसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुराने शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला वर्गीय पिके सडून गेली असून ऊस जमीनदोस्त झाला आहे. हातच्या फोडाप्रमाणे पिकवलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी खचून गेले आहेत. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.