डोंबिवलीत संतापजनक प्रकार (Photo Credit-File)
डोंबिवली: गणेशोत्सवापूर्वीच डोंबिवलीतील गणेशभक्तांवर मोठं संकट ओढवलं आहे. गणपती आगमनाला काही तास शिल्लक असताना डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवरील ‘आनंदी कलाकेंद्र’ नावाच्या कारखान्यातील मूर्तिकार प्रफुल परशुराम तांबडे अचानक गायब झाल्याने शेकडो भाविकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी मूर्ती बुक केलेल्या भक्तांना आता मूर्ती आणि पैसे दोन्हीही मिळाले नाहीत.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच, मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या भाविकांना मंगळवारी धक्का बसला. मूर्तिकाराचा फोन बंद असून, कारखानाही बंद झाल्याचे त्यांना दिसून आले. बाप्पाला घरी कसे आणायचे, या चिंतेने शेकडो गणेशभक्त हवालदिल झाले आहेत. त्यांची बुकिंगची रक्कमही वाया गेली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतील गणेशभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या कठीण परिस्थितीत, डोंबिवलीतील काही मूर्तिकार मदतीसाठी पुढे आले आहेत. ‘श्री साई आर्ट्स’, डोंबिवली यांनी जाहीर केले आहे की, त्यांच्याकडे असलेल्या काही मूर्ती गरजू भक्तांना देण्यास ते तयार आहेत. अधिक माहितीसाठी त्यांनी +९१ ९३२२५१९००४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे, ‘ललिता कला केंद्र’नेही प्रभावित झालेल्या भक्तांसाठी विशेष सवलतीच्या दरात गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे:
१.५ फूट मूर्ती: ₹५००
२.० फूट मूर्ती: ₹१,०००
ललिता कला केंद्राचे रिद्धेश सावंत यांनी सांगितले की, ‘आपल्या उत्सवाचा आनंद कायम राहावा हीच आमची इच्छा आहे.’ अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी ठाकुर्ली स्टेशन रोडवरील ललिता कला केंद्राला भेट द्या किंवा रिद्धेश सावंत यांच्याशी ९१३६८२१२८२ या क्रमांकावर संपर्क साधा.