संग्रहित फोटो
कराड : राज्यासह देशभरातून, खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. अशातच आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी दुपारी कोयना वसाहत (ता. कराड) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र नामदेव शेवाळे (रा. कोयना वसाहत, तालुका कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर कराड येथील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात काम करत असताना तिची ओळख शैलेंद्र शेवाळे याच्याशी झाली. नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाल्याने त्यांनी प्रेमविवाह केला. २००७ पासून संबंधित महिला आपल्या दोन मुलांसह कोयना वसाहत परिसरात भाडेतत्त्वावरील घरात रहात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शैलेंद्र महिलेवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करीत होता. सोमवारी दुपारी महिला कपडे वाळत घालत असताना शैलेंद्रने पाठीमागून येऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर ‘तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणत तिचे डोके भिंतीवर आपटले.
घटनेनंतर आरोपीने तिला खोलीत कोंडून घटनास्थळावरून पलायन केले. या मारहाणीत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेने तिच्या मुलांना माहिती दिली. मुलांनी तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कराड शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर पोलिस तपास करीत आहेत.
खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला
खराडी परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातुन दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात व तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक सणसवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी दोघावर खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पावने बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स मार्ट समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे.