पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेेते अमित शाह यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
कराड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौैऱ्यावर आले होते. त्यांनी प्रचारामधून कॉंग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. अमित शाह यांच्या टीकेला आता कॉंग्रेसकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्राची गद्दारांचे राष्ट्र अशी झालेली ओळख ही अमित शहांची देण आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला.
विंग (ता. कराड) येथील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल आमदार पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले, एकेकाळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पहिल्या क्रमांकावर होते. ते सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. याला दहा वर्षांतील महायुती सरकारची सुमार कामगिरीच जबाबदार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गोवा ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. हे चुकीचे असल्यास त्यांनी सांगावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ते कबूल केले आहे. त्याचा व्हिडिओ शहांनी पहावा आणि मग विकासाच्या बाता माराव्यात.
हे देखील वाचा : धक्कादायक! निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्याची हत्या, मिरजमध्ये उडाली खळबळ
पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुशिक्षित, बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. शाह आणि त्यांच्या नेत्यांनी सगळे उद्योग गुजरातला पळवले आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस तोंडाला पट्टी बांधून गप्प राहिले. मुंबई-अहमदाबाद ही सव्वालाख कोटींची बुलेट ट्रेन केली. याची कोणी मागणी केली होती. केवळ गुजरातला महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवण्यासाठी हा उद्योग त्यांनी केला. यासाठी कराड-चिपळूण हा मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प रद्द करून त्याचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवण्यात आला. अमित शाह यांनी उपस्थित केलेल्या 370 कलम, वक्फ बोर्ड, जम्मू-काश्मीरचा प्रश्न या मुद्द्यांचाही त्यांनी समाचार घेतला.
कॉंग्रेसबाबतचे वक्तव्य हास्यास्पद
काँग्रेसने सत्ता काळात काय केले? असे अमित शहा यांच्यासारख्या एका जबाबदार व्यक्तींनी केलेले वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, यावर खरंच बोलायचे असेल, तर मी मनमोहन सिंग सरकारने काय केले, ते सांगतो. त्यासाठी समोरासमोर या!, असे खुले आव्हानही पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाह यांना दिले.
विकासकामे हवेतून पडली का?
ते म्हणाले, “कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल ७०० कोटींचे भूकंप संशोधन केंद्र मी आणले. स्वतंत्र आरटीओ कार्यालय, प्रशासकीय इमारत, कराडचे बस स्थानक आदी कामे हवेतून पडली? की ती अमित शहा यांनी आणली?” असा टोलाही आमदार चव्हाण यांनी शहा यांना लगावला. “मी मुख्यमंत्री असताना कराडमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरिकांसमोर मांडला होता. परंतु, तो त्यांनी स्वीकारला नाही. कराडला नगराध्यक्षा भाजपच्या होत्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचा होता. केंद्रात पंतप्रधानही भाजपचेच होते. असे असताना तुम्ही का निर्णय घेतला नाही?” असा प्रतिसवालही आमदार चव्हाण यांनी शहा यांना केला.