धनंजय मुंडेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; 'या' प्रकरणी हायकोर्टाने दिला दणका(फोटो - एक्स)
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींत आता वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना मोठा दणका दिला आहे. पत्नी करुणा शर्मा यांना लागू पोटगीतील ५० टक्के रक्कम ४ आठवड्यांत न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने काढले आहेत. दरम्यान, याप्रकरणी कुटुंब न्यायालयाने दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे.
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा पोटगीस पात्र असल्याचे मान्य करत त्यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये देण्याचे आदेश धनंजय यांना दिले होते. त्यास धनंजय यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. दरम्यान, या याचिकेवर ८ आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. करूणा यांच्या वतीने वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.
21.87 लाख रुपये जमा करावे लागणार
निकालानुसार, ऑगस्ट २०२२ ते जून २०२५ या ३५ महिन्यांच्या काळात एकूण रक्कम ४३ लाख ७५ हजार इतकी होते. यातील २१ लाख ८७ हजार ५०० एवढी ५० टक्के रक्कम वांद्रे न्यायालयात पुढील ४ आठवड्यांत जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने काढले आहेत.
करुणा आणि धनंजय यांचे संबंध लग्नासारखेच
करुणा आणि धनंजय यांचे संबंध लग्नासारखेच असून, दोघांनी २ मुलांना जन्म दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. करुणाशी लग्न केले नाही, असा धनंजय यांचा दावा असला तरी त्यांचे संबंध वैवाहिक स्वरुपाचे असल्याचे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असून, त्यांना व मुलांना मिळून दरमहा २ लाख पोटगी द्यावी. बड्या नेत्याची जीवनशैली पाहता दंडाधिकाऱ्यांनी करुणा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश वांद्रे न्यायालयाने योग्यच ठरवला आहे.