तब्बल 500 कोटींचा भ्रष्टाचार अन् भक्तांची लूट! शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त (फोटो सौजन्य-X)
Shani Shingnapur Temple News Marathi : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. धर्मदया आयुक्तांनी त्यांच्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार आढळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले की दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि चौकशी केली जाईल.
शुक्रवारी आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. सुरेश धस यांच्यासह अनेक आमदारांनी चर्चेत भाग घेतला. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, देवस्थानमध्ये बनावट मोबाईल अॅप्स आणि बनावट पावत्या वापरून देणग्या गोळा करण्यात आल्या आणि हजारो बनावट कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
तपास अहवालानुसार, संस्थेच्या विविध विभागांमध्ये २४४७ बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेली पगाराची रक्कम काही इतर व्यक्तींच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. रुग्णालय विभागात ३२७ कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली, तर प्रत्यक्षात फक्त १३ कर्मचाऱ्यांची माहिती आढळून आली. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी ८० कर्मचारी, १०९ खोल्यांच्या भक्त निवासासाठी २०० कर्मचारी, १३ वाहनांसाठी १७६ कर्मचारी आणि प्रसादालयात ९७ कर्मचारी दाखवण्यात आले.
तसेच, देणगी आणि तेल विक्री काउंटर, पार्किंग, गोठा, शेती, वृक्ष संरक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज आणि सुरक्षा विभागांमध्येही बनावट कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, बनावट अॅप्सद्वारे लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे, ज्याची सायबर पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे.
शनी शिंगणापूर मंदिरात बनावट अॅपच्या माध्यमातून भक्तांकडून पूजेच्या नावाखाली 1800 रुपये घेतले जात होते. तसेच इतर साहित्यासाठी वेगळे पैसे आकारले जात होते. बोगस कर्मचारी भरती दाखवून त्यांच्या नावाने पगार काढला जात होता. तब्बल 2447 कर्मचाऱ्यांनी देवस्थानकडून वेतन देण्यात येत असल्याचे सांगितले आले. मात्र, प्रत्यक्षात 250-275 कर्मचारी देवस्थान होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तेथे चार डॉक्टर आणि 9 कर्मचारी असल्याचे तपासणीत उघड झाले. रुग्णालयाला बाग नसताना तेथे बाग असून तिच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले. भक्त निवासात 109 खोल्या असताना तेथे 200 कर्मचारी कामाला असल्याचे दाखवण्यात आले असल्याची आकडेवारी देखील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचून दाखवली.