पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यापासून बारामती मतदारसंघ कायम चर्चेत होता. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई होत होती. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे सर्वाचे लक्ष बारामतीच्या निकालाकडे लागले होते. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी १ लाखांहून अधिक मताधिक्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अनेकवेळी ‘मी कमी पडलो’ हे वाक्य सतत बोलून दाखवले.
मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य
पत्रकार परिषदेवेळी अजित पवार बारामतीमध्ये पराभव होण्यामागची कारणं काय? असा सवाल माध्यमांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले “आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो. बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. ते कोणत्या कारणाने पडलो, काय पडलो हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला ते कळेल. कारण सुप्रिया निवडून आली तरी ग्रामीण भागात हवा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. चौकात गुलाल वगैरे उधलले गेले. पण आम्ही कमी पडलो” तसंच, या मतदारसंघात भाजपाची साथ योग्यरित्या मिळाली नसल्याचीही टीका केली जातेय. त्यावर ते म्हणाले की, “ज्याने त्याने आपआपल्या परीने योग्य काम केलं. पण मीच कमी पडलो.” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
विधानसभेत त्या चुका दुरुस्त केल्या जातील
ते पुढे म्हणाले, “निकालामुळे आम्ही काही समाधानी नाहीत. मात्र जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. दिल्लीला वेळ मिळाला की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी सगळे सहकारी चर्चा करू. माझं स्वतःचं मत आहे. अपयश कशामुळे मिळालंय हे कळलंय. त्यामुळे ज्यात कमी पडलो आहे हे लक्षात घेऊन विधानसभेत त्या चुका दुरुस्त केल्या जातील. माझ्या स्वतःमुळे अपयश आल्याने मला कोणाला दोष द्यायचाच नाहीय. त्यामुळे काही दुरुस्ती करण्याची मानसिकता मी ठेवली आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.