देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये सभा (फोटो- ट्विटर)
कराड: स्वातंत्र्यानंतर देशात तब्बल ६० वर्ष सत्ता असताना काँग्रेसने नेमका काय विकास केला, हे सांगावे. कराड दक्षिणमध्येही याहून काही वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी आनंदराव चव्हाण, प्रेमिला चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चव्हाण कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधित्व असताना त्यांनी कराड दक्षिणसाठी काय केले असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भगवंत खुबा, खासदार उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप-महायुती सरकारने केलेली कामे आम्हीच केली असल्याचे सांगण्याची वेळ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आली असल्याचा टोला लगावत उपुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कराडला महामार्गावर होणारा उड्डाणपूल आम्हीच केला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत.
परंतु, महामार्गावरील सर्वच पुल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पैशांतून होत आहेत. जो विकास झाला, तो आम्हीच केल्याचे सांगण्याची प्रवृत्ती बरी नव्हे. मुख्यमंत्री असताना शिवाजी स्टेडियमसाठी त्यांनी फुटकी कवडीही दिली नाही. तुम्ही केलेल्या कामांचेच श्रेय घ्या. केलेल्या कामांचे श्रेय जनताच देत असते. ते मागावे लागत नाही. खरंतर पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या कामाचे खरे श्रेय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे असून त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
उपुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यात काही अडथळे आले. नंतर उपमुख्यमंत्री असताना जमीन खासगी मालकीची असली तरी त्याची मालकी संबंधितांना देऊन त्याठिकाणी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता कराडच्या पाटण कॉलनी व मलकापुरातील झोपडपट्टी वासियांना आपण पक्की घरे बांधून देऊ. कराडच्या एमआयडीसीला आपण फाईव्ह स्टार दर्जा देणार असून या ठिकाणी मोठे उद्योग येतील, असा िवश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन
जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, चव्हाण कुटुंबीयांनी ६० वर्षांत अनेक मंत्रिपदे भूषवताना कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस काम आणले नाही. काँग्रेसच्या याच भूमिकांमुळे बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. आता कराड दक्षिणमध्येही परिवर्तन हाेणार असून मी ज्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकलो. त्याचवेळी त्याची नांदी झाली, असे त्यांनी सांगितले.
🕜 1.15pm | 15-11-2024📍Karad, Satara | दु. १.१५ वा. | १५-११-२०२४📍कराड, सातारा.
🪷BJP Jahir Sabha for Karad South BJP candidate Atul Bhosale at Karad, Satara
🪷कराड दक्षिण भाजपा उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड, सातारा येथे भाजपा जाहीर सभा
🪷कराड दक्षिण भाजपा… pic.twitter.com/raGevLF7eG— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2024
आमच्या पेनला लकवा मारलेला नाही
फाईलवर सही करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारतो, या खासदार शरद पवार यांनी केलेल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. परंतु, आमच्या पेनला लकवा मारलेला नाही. मी मागणीपत्रांवर नॉनस्टॉप सह्या करेन, अशी ग्वाही उपुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा: “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन
पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय मटेरियल
गेल्या दहा वर्षांत कराड दक्षिणमधील जनतेकडून चूक झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे बुद्धिवान नेतृत्व आहेत. त्यामुळे मुळात ते विधानसभेचे मटेरियल नसून आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. कराड दक्षिणच्या जनतेने त्यांना दक्षिणेत अडकवून न ठेवू नये, अशी खोचक टिपण्णी करत यावेळी कराड दक्षिणच्या जनतेने आपली चूक सुधारावी, आवाहन उपुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.