सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोसायटी भेटीदरम्यान नागरिकांनी प्रभागात आतापर्यंत झालेल्या विकासकामांबाबत आपले अनुभव आणि निरीक्षणे मांडली. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, वाहतूक नियोजन, सार्वजनिक सुरक्षितता, उद्यान व क्रीडासुविधा अशा दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्द्यांवर नागरिकांनी स्पष्टपणे अपेक्षा व्यक्त केल्या. त्याचबरोबर काही भागांत अद्याप राहिलेल्या समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचाही उल्लेख करण्यात आला. उमेदवारांनी प्रत्येक सूचनेची नोंद घेत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, वेळबद्ध व परिणामकारक उपाययोजना राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
या जनसंवाद दौऱ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच सोसायटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग दिसून आला. अनेक नागरिकांनी थेट भेटून सूचना दिल्या, तर काहींनी लेखी स्वरूपात मागण्यांची यादी सादर केली. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वास व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उमेदवारांनी आभार व्यक्त केले. तसेच निवडणुकीनंतरही सोसायटी-स्तरीय संवाद, फीडबॅक मीटिंग्स आणि ठराविक कालावधीत प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभागातील विकासाला गती देण्यासाठी नागरिकांच्या सहभागावर भर देत असून “संवादातून उपाय” या भूमिकेतून प्रभाग क्रमांक ९ मध्ये सातत्याने जनतेशी जोडले राहणार असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.
सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गेल्या 2 दिवसाखाली बाणेर येथे आयोजित “विजयी संकल्प सभा” या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुस–म्हाळुंगे परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. अमोल बालवडकर यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय अन्यायकारक असून कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करणारा आहे, अशी भावना सुस–म्हाळुंगे परिसरात व्यक्त होत आहे, असे यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील विकासकामे, संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद पाहता अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारणे समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचेही त्यांनी सांगितले.






