फोटो - एक्स (ट्वीटर)
मुंबई : चित्रपटगृहामध्ये लवकरच धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून धर्मवीर 2 हा चर्चेमध्ये राहिला आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर आता धर्मवीर 2 चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल (दि. 20) प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक राजकीय नेते उपस्थित केले. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना देखील चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली. माझा सिनेमा आल्यानंतर अनेकांचे मुखवटे समोर येतील, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
त्यांना विचारांची गद्दारी मान्य नव्हती
धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय व्यक्तींसह मराठी चित्रपटसृष्टीमधील आणि बॉलीवुडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली चित्रपटाबाबतची इच्छा व्यक्त केली. फडणवीस म्हणाले, धर्मवीर सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना या सिनेमाने चेतवले. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा याचा भाग दोन येईल, हे कुणाला माहीत नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचा भाग दोन येईल, याचीही कुणाला कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरू झाला. दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिंदे यांनी ज्याप्रकारे आज महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. ते पाहता आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
धर्मवीर 3 व 4 ची तयारी सुरू करावी
पुढे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मलादेखील एक सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली की, निश्चितच मी सिनेमा काढणार”, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. “धर्मवीर ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो आणि अनेक लोकांना असामान्य कसा बनवतो, हे दिघे साहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळते. तरडे यांनी आतापासूनच धर्मवीर 3 व 4 ची तयारी सुरू करावी. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे, तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही. हा मला विश्वास आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.