फोटो सौजन्य - सोशल मीडिया
देहू : आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 28 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे देहूमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. पालखीचे घोड तयार झाले असून रथ देखील दुरुस्ती करण्यात आला आहे. पालखीला आणि मंदिर परिसराची स्वच्छता तसेच सजावट केली जात आहे. दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी विशेष छत्री तयार करुन घेण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण पालखीवेळी छत्री धरण्यात येते. या पालखीवर धरलेल्या छत्रीमुळे पालखी अगदी लांबूनही शोभून दिसते. यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 339 वे वर्ष आहे. त्यामुळे पालखी व्यवस्थापकांकडून खास तयारी केली जात आहे. पालखीसाठी यावेळी परराज्याहून खास छत्री मागवण्यात आली आहे. चैन्नईमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी छत्री बनवून घेण्यात आली आहे. या छत्रीवर आकर्षक कलाकुसर व नक्षीकाम करण्यात आले आहे.
खास कारागिरांकडून कलाकुसर
संत तुकाराम महाराज संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतली आहे. या छत्रीसाठी खास वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. यासाठी छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे. यामुळे यंदा पालखी सोहळ्यात ही छत्री एक आगळे वेगळे लक्षवेधी ठरणार आहे.