म्हसवड : टाळ, मृदंग, ढोल, ताशा अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात माण तालुक्यातील पानवण येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर आषाढी वारीचा सोहळा निर्बंधमुक्त होत आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे (Ashadhi Wari 2022) प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले आहे. शेकडो भाविक पायी चालत अत्यंत शिस्त व संयमी पद्धतीने पालखीचे सायंकाळी पाच वाजता म्हसवड येथे आगमन झाले.
पालखीसमोर भालदार, चोपदार, हजारो सेवेकरी, वारकरी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करुन डोक्यावर पांढरी टोपी व कपाळावर टिळा हातात भगवे झेंडे घेतलेले वारकरी टाळ वाजवत विठ्ठल नामाचा गजर करत ‘गण गण गणात बोते’ या गजराने अवघा परिसर दुमदुमला होता. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संत गजानन महाराजांची पालखी म्हसवड शहरात दाखल होताच म्हसवडकरांकडून पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण, वारकरी पालखीत दाखल झाले होते.
पंढरपूरला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सकाळी अकरा वाजता गंगोती फाटा व मेघा सिटी येथे पालखीचे स्वागत केले. चहा-नाष्टा करण्यात आला. दुपारी तीन वाजता म्हसवड येथील चतुर्थी बंगला येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री म्हसवड येथील कोल्हे मळा येथे मुक्काम व महाप्रसाद आयोजित करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला सकाळी श्री संत गजानन महाराज आश्रमाच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. गजानन महाराजांना नैवद्य दाखवण्यात आला. संत गजानन महाराजांच्या पालखीचे ‘गण गण गणात बोते’ म्हणत तसेच विठुरायाच्या जयघोषात हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
दिंडी चालक उमा तोरणे, गोरखनाथ पिंजारी महाराज, पांडुरंग महाराज, अध्यक्ष मधुकर नरळे त्याचबरोबर पानवण, गंगोती, पुळकोटी येथील भजनी मंडळ व आश्रमाच्या अध्यक्षा रमा तोरणे यांनी या पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. आश्रमाच्या वतीने व अन्न दाते यांनी वारकऱ्यांना व भक्तगणांना महाप्रसादाची विविध ठिकाणी सोय केली आहे.