संग्रहित फोटो
पुणे : ‘लाडकी बहीण’ योजनेत वार्षिक अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा लाभ द्यायचे ठरले होते. तेव्हा वाटले की, या निकषात न बसणारे अर्ज करणार नाहीत, मागणी करणार नाहीत. मात्र, काही जणांनी अर्ज केले आणि लाभ घेतला. घरी कार असणाऱ्या काही केसेस समोर येत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नसल्याचे सांगत, सरसकट सर्वांना योजनेचा लाभ देणे ही आमची चूक झाली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिंचन नगर येथे आयोजित पुणे कृषी हॅकॅथॉनच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. पवार म्हणाले, अडीच लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्यांकडून आता दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र त्याची व्यवस्थित माहिती घेऊन, खरोखरच ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे, त्याच लाभार्थ्यांना ही योजना सुरू ठेवली जाणार आहे. ही योजना सुरू करताना निकष तपासण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेले, घरी कार असलेले आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकले. मात्र, आता अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारकडे खूप कमी वेळ होता. दोन-तीन महिन्यांत निवडणुका होत्या. त्यावेळी निकष तपासण्यासाठी जेवढा वेळ हवा होता, तेवढा मिळाला नसल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.
नागालँडमधील ७ आमदारांनी पक्ष सोडल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, “दोन-तीन महिन्यांपूर्वी नागालँडचे आमदार भेटायला आले होते. त्यांची कामे अजिबात होत नसल्याची ते तक्रार करत होते. त्या संदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता होती. नागालँड आसामला लागून असल्याने याबद्दल तेथील मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याशी बोलणे झाले होते. सर्वच आमदार गेल्याने पक्षांतर बंदीनुसार कारवाई होऊ शकत नाही.
हे सुद्धा वाचा : शरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकत्र; बंद दाराआड काय चर्चा झाली?
कोकाटे यांचे कान टोचले
माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, “माणिकराव कोकाटे यांना मागेही शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना अशा प्रकारचे वक्तव्य झाले नाही पाहिजे असे सांगितले होते. बळीराजा आहे, लाखांचा पोशिंदा आहे. मी सुद्धा शेतकरी असून काही गोष्टी बोलून चालत नाहीत, मनात ठेवायच्या असतात. हे फार महागात पडते असेही पवार म्हणाले.