रांजणी : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या बंडखोर उमेदवाराने बाजी मारली. माजी सभापती देवदत्त निकम बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. निकम विजयी होताच मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकच जल्लोष झाला त्यामुळे आंबेगावात संपूर्ण पॅनलवर वर्चस्व जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहीले असले तरी गाजावाजा मात्र फक्त देवदत्त निकम यांचाच पाहायला मिळाला.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. बाहेर निकम समर्थकांची गर्दी जमली होती. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक होती. मात्र इथे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम यांनीच भाव खाल्ला अशी चर्चा रंगली.
-िशवाजीराव आढळराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान वळसे पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती . निकम यांच्या बंडखोरीनंतर वळसे पाटलांनी निवडणुकीची सांगता सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी देवदत्त निकम यांच्यावर ताशेरे देखील ओढले होते . त्यामुळे मंचर बाजार समितीत वळसे पाटील गड राखणार का? याबाबत बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते . कोणी माझा फोटो लावला , कोणी झेंडा लावला तरी काळजी करण्याचे कारण नाही. काहींनी पक्षाला आव्हान देण्याचं काम केलं परंतु पक्षाने जे उमेदवार दिले त्यांनाच माझा पाठिंबा आहे, असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांना फटकारले होते. तरी देखील निकम मोठ्या फरकाने निवडून आल्याने बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी ऊफाळून आल्याचे देखील दिसून आले.
दरम्यान राष्ट्रवादिचे बंडखोर उमेदवार निकम निवडून आल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर निकम समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केला. या जल्लोषात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. तसेच विजयी झाल्यानंतर मतदान केंद्रा बाहेर देवदत्त निकम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विजयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले मला पराभूत करण्यासाठी धनदांडग्यानी मतांसाठी पैशाचा बाजार मांडला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मात्र शिवसेना भाजपच्या नेत्यांनी मला सहकार्य केल्यामुळे मी विजयी झालो ज्यांनी मला विजयी होण्यासाठी मदत केली त्यांचे ऋण मी शेवटपर्यंत विसरणार नाही. यावरून एकूणच असे दिसते की देवदत्त निकम यांना अप्रत्यक्षरीत्या शिवसेना भाजपने मदत केल्यानेच त्यांचा विजय झाल्याचे देखील बोलले जाते.
–विजयानंतर निकम पुढे काय करणार?
निकम हे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती होते. त्यांनी शिरूर लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. ते दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक असताना त्यांची उमेदवारी नाकारली. तरी देखील त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत निवडणूक जिंकल्याने निकम यांनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान देऊन आंबेगाव तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या विजयानंतर निकम पुढे काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जुळवून घेणार की भाजपा-शिवसेनेचा मार्ग धरणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.