वर्धा : जागतिक कुस्ती महासंघ म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. 45 दिवसांत निवडणुका होऊ न शकल्याने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. परंतु, भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द झाल्याने महासंघासमोर अनेक समस्यांचे जाळे आता उभे राहिले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका लवकरात लवकर घेणे हा पर्याय
भारतीय कुस्ती महासंघाला पुन्हा सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी प्रथम कुस्ती महासंघाच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी प्रथम पाच राज्यांतील उच्च न्यायालयाने निवडणुकीवर आणलेली स्थगिती उठवावी लागणार आहे. देशातील 5 राज्यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवडणुकीलाच स्थगिती दिली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा जर भारताला सदस्यत्व प्राप्त करायचे असेल, तर या पाच राज्यांतील समस्यांचा तिढा सोडवून त्यांना न्याय देणे अपेक्षित असणार आहे. प्रथम पंजाब, हरियाणा या राज्यांतील उच्च न्यायालयाने कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती.
भारतीय खेळाडू तटस्थ राहून जागतिक स्पर्धा खेळू शकतील
भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द झाले असले तरीही भारतीय खेळाडू जागतिक स्पर्धा खेळू शकतात. परंतु, त्यांना भारताचा तिरंगा वापरता येणार नाही. तटस्थ झेंडा घेऊन त्यांना जागतिक स्पर्धा खेळता येऊ शकतात.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ताकीद दिली होती
निवडणुका वेळेत घ्या, अशी ताकीद जागतिक कुस्ती महासंघाकडून देण्यात आली होती. पण, निवडणुका झाल्या नाही. अखेरीस युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केल्याने क्री़डाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द
वेळेत निवडणुका न घेतल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. याआधीदेखील निवडणुका वेळेत घेण्यासाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाला ताकीद दिली होती. परंतु, तरीही भारतीय कुस्ती महासंघाने वेळेत निवडणुका (Elections) घेतल्या नाहीत. त्यामुळे ही कठोर कारवाई युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने अगोदरच लिहिले पत्र
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 30 मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पुढच्या 45 दिवसांमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. तसेच जर या निवडणुका झाल्या नाहीत तर तुमचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याचे या पत्रात स्पष्ट म्हटले होते.
बृजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाचे आरोप प्रकरणामुळे निवडणुका लांबल्या
क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघांच्या सदस्यांना निलंबित करण्यात आले आणि अॅडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर कुस्ती महासंघाच्या निवडणुकांसाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी न्यायाधीश एम एम कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीदेखील करण्यात आली होती.
Web Title: Detailed report on wrestler federation of india many problems after its membership was revoked nryb