फोटो - ट्वीटर (एक्स)
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधान सभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये भाजप पक्षनेतेव मंत्री अमित शाह पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. भाजपच्या निवडणूकीपूर्वीच्या चर्चेसाठी आणि मोर्चेबांधणीसाठी अमित शाह यांच्यासोबत भाजप पक्षांच्या राज्य स्तरीय नेत्यांची कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये भाजपला निवडणूक लढवण्यासाठी मार्गदर्शन आणि जागावाटप याबाबत चर्चा होणार आहे. महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या या भाजपच्या महाअधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. या पुढचे सरकार महायुतीचेच असणार, असा विश्वास देखील उपमुपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधानसभेनंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार निवडून येणार
भाषणामध्ये बोलताना उपमुपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप दिवंगत नेत्यांची आठवण काढली. यावेळी ते म्हणाले, भाजप पक्ष पुण्यामध्ये वाढवण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली. दिवंगत खासदार गिरीश बापट, विश्वास गांगुरडे, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप अशा अनेक नेत्यांनी कष्ट घेतले आहेत. आणि मागील दोन वर्षापासून ते आपल्यासोबत राहिले नाहीत अशा सर्वांना मी आदरांजली अर्पित करतो. आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आपली गुरु सारखी आणि आई समान असलेला भारतीय जनता पक्ष आहे. आपल्याला एकच गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे आपला गुरु आहे तो भगवा ध्वज आहे. या ध्वजाला मी नमन करतो. आजची तारीख लिहून ठेवा की, या विधानसभेनंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार निवडून येणार आहे. हा भाजपचा विचार गावागावा पर्यंत पोहचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
खोटं असतं त्यांचं वय मोठं नसतं
विधानसभेमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्यावर देखील फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींसमोर खरे कारण सांगितले. ते म्हणाले, यावर्षीच्या निवडणूकीमध्ये आपण तीन पक्षांविरोधात लढत नव्हतो तर चार पक्षांच्या विरोधात लढत होतो. त्या तीन पक्षांमध्ये आपल्याला हरवण्याची ताकद नाही. चौथा जो पक्ष होता तो खोटा नरेटिव्ह होता. त्याच्या विरोधामध्ये लढताना आम्ही कमी पडलो. आम्ही जिंकतो किंवा आम्ही शिकतो. या निवडणूकीमध्ये आम्ही शिकलो की फेक नरेटीव्हला खऱ्या नरेटीव्हने उत्तर द्यायचं कसं आहे ते शिकलो. आमचा फक्त 0.03 टक्क्यांनी पराभव झाला. त्यामुळे थोडी मेहनत करण्याची गरज आहे. फेक नरेटीव्ह विरोधात आम्ही प्रभावी उत्तर देऊ शकलो नाही. संविधान बदलणार आणि आरक्षण जाणार असा खोटा नरेटीव्ह तयार करण्यात आला. पण जे खोटं असतं त्यांचं वय मोठं नसतं. जे खरं असतं त्यांचंच वय मोठं असतं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
ही लबाड लोकं आहेत
पुढे फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटं एखाद्या निवडणूकीमध्ये चालतं. ह्यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी एक टाचणी मारली तरी त्यांच्या फुगा फुटणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये याची सुरुवात झाली. त्यांचे 20 आमदार कधी आमच्याकडे आले हे देखील त्यांना कळलं नाही. हा त्यांच्या फुगा फुटला आहे. त्यांच्या इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. हे किती नाटकी आणि लबाड लोकं आहेत. सभागृहात एक बोलतात आणि गावात बाहेर जाऊन यांचं पोस्टर पहिलं असतं. योजनांच्या विरोधात कोर्टात जातात. मविआची एक स्ट्रटजी आहे की महिलांचे फॉर्म भरुन घ्यायचे आणि सबमीट करायचे नाही. त्यांच्या मनामध्ये सरकार विरोधात मत तयार करायचे असे महाविकास आघाडीमध्ये चालू आहे. भाजपच्या नेत्यांना उत्तर देता येतं मात्र आदेशाची वाट पाहत बसतात. आज मी परवानगी देतो ज्याला बॅंटिग करायची आहे त्याने करा, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सल्ला देत मविआवर निशाणा साधला आहे.