देहूरोड : देहूगाव येथील संत तुकाराममहाराज संस्थानच्यावतीने दिवाळीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी महोत्सवाची ‘भक्तीरस तुकोबांचा’ या संगीतमय कार्यक्रमाने उत्साहात सांगता झाली. युवा गायिका, संगीत विशारद काजल भेगडे हिने सादर केलेल्या अभन्ग आणि भक्ती गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
काजल हिने सादर केलेल्या ॐ नमोजी आद्या, राम कृष्ण हरि, सुंदर ते ध्यान, विठोबा रखुमाई, संतभार पंढरीत – संत जनाबाई पंढरीचा वारकरी, कोठे गुंतलासी योगियांचे ध्यानी, आनंद अद्वय नित्य निरामय, आपुल्या माहेरा जाईन मी आता या अभंग व भक्ती गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. जे का रंजले गांजले या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. काजल हिला पांडूरंग वाघोले (संवादिनी) हभप भीमराव हांडे (पखवाज), अजित लोहर (तबला), गणेश कदम ( टाळ), तसेच श्रावणी भेगडे, प्रज्वल भेगडे ( कोरस) यांनी साथसंगत दिली. निवेदन प्रथमेश भेगडे यांनी केले.