खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शेतकरी संघटनेला काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातीलअणदूर परिसरात बोगस रासायनिक खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित कृषी सेवा केंद्रातून खताची पोती खरेदी करून त्याची पडताळणी केली. खताच्या पोत्यांवर 20:20:0:13, 15:15:10, 18:46 यांसारख्या रासायनिक खतांचे उल्लेख असतानाही प्रत्यक्षात पोत्यांमध्ये खताऐवजी लालसर माती असल्याचा संशय निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील शेतकरी ऍग्रो कार्पोरेशन कंपनीचे शेतकरी राजा नावाचे हे खत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संशयित खताने भरलेला ट्रक थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही पोती उघडून पाहण्यात आली असता त्यामध्ये खताऐवजी माती असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित कंपनी व विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार नवीन नसून गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माथी बनावट खत मारले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून विविध रासायनिक खतांच्या नावाखाली माती भरून विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय जमिनीची सुपीकता आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत बनावट खतांचा हा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
शेतकरी संघटनांनी संबंधित कंपनी, विक्रेते आणि या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून बनावट बियाणे, खत आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खताच्या नावाखाली माती विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. या रॅकेटमागील सूत्रधारांना अटक करून त्यांची संपूर्ण साखळी उघड करावी,” अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठांच्या विक्री व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कृषी विभागाच्या देखरेख आणि तपासणी यंत्रणेचीही कसोटी लागणार आहे.
Dharashiv News: बेंबळीत वाढदिवसाचा आनंद क्षणात मातीमोल! ५० वर्षीय महिलेला विषबाधा अन्…






