धाराशिवमध्ये बेकरीच्या केकमुळे महिलेला विषबाधा
५० वर्षीय महिलेला विषबाधा झाल्याची गंभीर घटना
बेकरीविरोधात कठोर कारवाईची मागणी
धाराशिव: धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील एका बेकरीतून खरेदी केलेला वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर ५० वर्षीय महिलेला विषबाधा झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. केक खाल्ल्यानंतर काही वेळातच संबंधित महिलेला तीव्र पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित बेकरीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वाढदिवसानिमित्त बेंबळीतील एका बेकरीमधून केक खरेदी करण्यात आला होता. संबंधित महिलेनेही या केकचे सेवन केले. मात्र काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत बिघाड होण्यास सुरुवात झाली. पोटात असह्य वेदना होऊ लागल्या आणि सतत उलट्या होत असल्याने कुटुंबीयांची धावपळ उडाली. त्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा केक कुटुंबातील अन्य लोकांनी न खाल्ल्याने ते या त्रासातून वाचले आहेत.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.या घटनेची नोंद बेंबळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विषबाधेचे नेमके कारण केक होता का, याबाबत अधिकृत अहवाल अद्याप आलेला नसला तरी केक खाल्ल्यानंतर लगेचच प्रकृती बिघडल्याने संशयाची सुई संबंधित बेकरीकडे वळली आहे.
Kitchen Tips: उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
घटनेनंतर नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अनेक बेकरी, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर अन्नसुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या मते, बेकरीमध्ये वापरले जाणारे क्रीम, दूधजन्य पदार्थ, अंडी, रंग आणि इतर साहित्य यांची गुणवत्ता तपासली जात नसल्याने अशा घटना घडत आहेत. केक तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, कालबाह्य साहित्याचा वापर होतो का, तसेच साठवणूक योग्य पद्धतीने केली जाते का, याची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.संबंधित बेकरीतील केकचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, दोषी आढळल्यास बेकरीचा परवाना रद्द करावा आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
NANDED : नांदेडच्या कौलगुडा गावात भंडाऱ्याच्या प्रसादातून विषबाधा; तातडीचे उपचार सुरु
एकीकडे नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ पुरविण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना दुसरीकडे अशा घटना समोर येत असल्याने अन्नसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेंबळीतील या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन केवळ कागदी कारवाई करणार की प्रत्यक्षात दोषींवर कठोर पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित यंत्रणांच्या अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.






