(Photo - X)
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : दुष्काळ, नापिकी, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये. पीक विमा आणि अन्य कर्जांसंदर्भात शासनाचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांवर अनावश्यक दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे समुपदेशन करावे, त्यांना धीर द्यावा आणि आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असेही त्यांनी बजावले. (Pratap Sarnaik)
नांदेड जिल्ह्यात बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने अधिकाऱ्यांकडून वारंवार तगादा लावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतीचे नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी वारंवार तगादा लावणे, दबाव आणणे किंवा मानसिक त्रास देणे टाळले पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली.
जिल्ह्यात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरी तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे समुपदेशन करावे, त्यांना धीर द्यावा आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या मानसिक सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जवसुलीसाठी खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित सावकारांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दबाव आणून त्यांची पिळवणूक होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पीक विमा आणि अन्य कर्जांसंदर्भात शासनाकडून निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांवर अनावश्यक दबाव आणला जाणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संबंधित विभाग, बँका आणि वसुली यंत्रणांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परभणी आणि नांदेडसह अन्य जिल्ह्यांमध्ये कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
शेतकऱ्यांचे जीवन आणि मानसिक सुरक्षितता महत्त्वाची आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.






