फोटो सौजन्य- सोशल मीडिया
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे निर्देश पाचही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाने धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रामा नाथन आर यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे धुळे येथे आगमन झाले असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्वाती काकडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. निवडणूकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चावर नोडल अधिकारी तसेच सहाय्यक खर्च निरीक्षकांनी लक्ष ठेवून दैनंदिन अहवाल विहीत वेळेत सादर करावेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मूल्यमापन करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित करावा. तसेच सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांक्षी समन्वय ठेवावा, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या, जाहिरातींवर एमसीएमसी कमिटीने बारकाईने लक्ष ठेवावे, पक्ष व उमेदवारांच्या प्रत्येक प्रचार जाहिरातींचा समावेश खर्चात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नलावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. धिवरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे यांनी आपल्या विभागाची माहिती पीपीटीद्वारे दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविकात धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाच्या रचनेविषयी माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी आभार मानले. बैठकीस आयकर, वस्तु व सेवा कर विभागाचे उपायुक्त, बँक, रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.