फोटो सौजन्य - Social Media
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशवादाविरोधातील आपली भूमिका ठामपणे मांडण्यासाठी विविध देशांमध्ये खास शिष्टमंडळे पाठवली. या शिष्टमंडळांपैकी एका महत्त्वाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ठाण्याचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांच्या १४ दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचा अनुभव नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘Diplomacy by Doctor’ या विशेष मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम २० जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील सुप्रिम बँक्वेट हॉल येथे होणार आहे. ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, संस्था, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दहशतवादाविरोधात भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांची स्थापना केली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करत संयुक्त अरब अमीरात (UAE), लाइबेरिया, कांगो लोकतांत्रिक प्रजासत्ताक आणि सिएरा लिओन या देशांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली. ‘झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम’ हा संदेश त्यांनी स्पष्टपणे मांडत जागतिक स्तरावर भारताच्या दृष्टीकोनाला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
या कार्यक्रमात डॉ. शिंदे यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. एका तरुण खासदाराला मिळालेली ही जबाबदारी, त्यांनी केलेले प्रतिनिधित्व, आणि दौऱ्यातील त्यांचे अनुभव प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकण्याची ही सुवर्णसंधी आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील विविध संस्थांनी मिळून केले असून, यावेळी त्यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ठाणेकरांसाठी केवळ माहिती देणारा नव्हे, तर देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक सहभागाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा ठरणार आहे.