माथेरान शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख जलस्रोत असलेला शार्लोट लेक मुसळधार पावसामुळे भरून ओव्हरफ्लो झाला असून, तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी धबधब्याच्या स्वरूपात कोसळत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, याठिकाणी पर्यटकांकडून धोकादायक कृती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तलावाच्या सभोवती तारेच्या संरक्षण जाळीची मागणी केली आहे.
ब्रिटिश कालीन शार्लोट लेक नेहमी जुलै महिन्याच्या सुमारास भरतो. परंतु यावर्षी जून महिन्याच्या मध्यावरच तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पावसाळ्यात या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याच्या नादात काही हौशी पर्यटक तलावाच्या पाण्यात उतरतात, आणि ही गोष्ट प्राणघातक ठरू शकते.
या तलावात अनेक वर्षांपासून गाळ काढलेला नाही, त्यामुळे पाण्यात पाय रुतण्याचा धोका आहे. याशिवाय तलावाची खोली ५० मीटरपेक्षा अधिक असल्याने खोल पाण्यात जाणे अत्यंत धोकादायक आहे. याचाच परिणाम म्हणजे मागील आठवड्यात तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मनसेकडून हे ठिकाण सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
माथेरान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना निवेदन दिले असून, तलावाच्या सभोवताली तारेच्या संरक्षण जाळीची मागणी केली आहे. हे संरक्षण केल्यास पर्यटक धबधब्याचा आनंद घेतील, मात्र तलावात जाण्याचा धोका टाळता येईल आणि भविष्यातील संभाव्य अपघात रोखता येतील.
शार्लोट लेक हे माथेरानचे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण केंद्र आहे, मात्र त्याचे संवर्धन आणि सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली जाणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन जाळी बसवण्याचे कार्य त्वरित हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.