File Photo : Satara Palika
सातारा : गोडोली येथील भागामध्ये पाणी टँकर उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम, गोडोलीचे माजी नगरसेवक शेखर मोरे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली. यावेळी मोरे यांनी निकम यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी करत गुरुवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. याबाबतची तक्रार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे करणार असल्याचे कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी सांगितले. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
हेदेखील वाचा : निवडणुकाही झाल्या आता ‘लाडक्या बहिणीं’ना प्रतिक्षा सहाव्या हफ्त्याची; 1500 की 2100 संभ्रम कायम…
प्राधिकरणाच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे गोडोली, शाहूनगर, कामाठीपुरा या भागाला गेल्या दोन दिवसांपासून पाणी येत नव्हते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी नगरसेवक शेखर मोरे यांनी केली होती. मात्र, सातारा पालिकेचा टँकर दूरवर गेल्यामुळे सध्या पाणी देता येणे शक्य नसल्याची बतावणी अधिकारी प्रशांत निकम यांनी केली. टँकर येत नसल्याच्या कारणास्तव संतापलेल्या शेखर मोरे यांनी पालिकेत येऊन निकम यांना विचारणा केली. त्यावेळी शब्दाला शब्द वाढत जाऊन दोघांमध्ये जोरदार हमरातुमरी झाली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वादावर पडदा पडला.
सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले. अचानक काम बंद झाल्यामुळे सातारा पालिकेचे 35 विभाग बंद झाले. सर्व कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन निषेध आंदोलन केले. नंतर कर्मचारी पालिका युनियनचे सचिव मनोज बिवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची तक्रार केली.
याबाबत शेखर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेचे कर्मचारी गोडोलीसारख्या भागाला पाणीपुरवठा करत नसल्याने नागरिकांना अडचण होत आहे. तसेच पाणी देण्याच्या ऐवजी उलटसुलट उत्तरे देत आहेत, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली. निकम यांच्याविरोधात गोडोली ग्रामस्थ पालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, तातडीने अहवाल घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले.
हेदेखील वाचा : राज्याचा मुख्यमंत्री अखेर दिल्लीने ठरवला ! अमित शहांकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीही ठरला?