File Photo : BJP
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. पण, महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. बहुमताचा आकडा पार केल्याने महायुतीकडून आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असताना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील, असे अखेर दिल्लीत ठरले आहे. इतकेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शिक्कामोर्तबही झाल्याचे सांगितले जात आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राने वाढवला दिल्लीचा पारा; गारठलेल्या राजधानीत महायुतीच्या नेत्यांच्या हाय व्होल्टेज बैठका
महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला संमतीही दिली.
दरम्यान, यापूर्वी बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी भाजपचे वरिष्ठ मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घेतील, तो त्यांना मान्य असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, यापूर्वी ते मुख्यमंत्रिपदावर ठाम होते. दिल्लीतून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन आल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, त्यांच्या देहबोलीवरून ते मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत नाखूश असल्याचे दिसत होते.
भाजप निरीक्षक टीम मुंबईला पाठवणार
दिल्लीतील बैठकीनंतर भाजप आपली निरीक्षक टीम मुंबईला पाठवणार आहे. मुंबईत होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे. तर 2 डिसेंबर रोजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शपथविधीसाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शाह यांच्यासह भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व महत्त्वाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांचा बड्या खात्यांवर लक्ष?
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांच्या विभाजनावरही चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्रालय तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात शिंदे यांनी भाजपकडे बड्या खात्यांची मागणी केली आहे. महसूल विभागाव्यतिरिक्त त्यांचे लक्ष विशेषतः कृषी आणि ग्रामीण विकासावर आहे.
हेदेखील वाचा : “सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण…”; खासदार श्रीकांत शिंदे यांची वडिलांसाठी भावूक पोस्ट