File Photo : Mohite Patil
अकलुज : गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल, असा दमच माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना दम भरला.
सांगोला तालुक्यातील महूद येथे शेकापच्या मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आले असता त्यांचे जेसीबीने फुले उधळत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे नेते आणि सांगोला विधानसभेसाठी इच्छुक असणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांची व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार मोहिते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल’.
दरम्यान, जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल, अशा शब्दांत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.
सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बाजूने पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शेकाप कार्यकर्त्यांनी भाषणात सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल, असा इशारा दिला. यावेळी ‘नको झाडी डोंगर, नको शिमला गुवाहटी, आमच्या गणपतराव आबांचे सांगोलाच भारी’ अशा जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी महुद परिसर दणाणून सोडला होता.