कल्याण भिवंडी महामार्गावर मद्यधुंद कार चालकाने सात ते आठ पादचाऱ्यांना धडक देऊन जखमी केले आहे. अनेक गाड्यांचे नुकसान केले आहे. या मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलीस चौकीलाही जोरदार धडक दिली आहे. सागर जोहरे नामक या कार चालकास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास भिवंडीहून कल्याणच्या दिशेने टाटा एक्सा ही कार भरधाव चालविली जात होती. कार चालकाने अनेक गाड्यांना जोराची धडक दिली. रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी आणि बाईक चालकांना धडक दिली. या धडकेत सात ते आठ जण जखमी झाले आहे. मद्यधुंद कार चालकाने वाहतूक पोलीस चौकीस ठोकली. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वार्डन धीरज सोनवणे यांनी त्वरीत कार चालकास ताब्यात घेतले.
कार चालकाला जमावाने घेरले होते. कसेबसे पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. काही वाहन चालक बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र ही घटना कोनगाव आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने यापैकी एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होणार आहे. चालकास वैद्यकीय तपासणीकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.