बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात २०१५ पासून (Ashadhi Wari 2022) सुरु करण्यात आलेल्या निर्मलवारी या उपक्रमांतर्गत फिरते शौचालय या सुविधेमुळे पालखी मार्गावरील गावांची स्वच्छ्ता अबाधित राहण्यास मोठी मदत झाली आहे.
विठु माऊलीच्या ओढीने निघालेला अथांग जनसागर म्हणजे वारी मग ती ज्ञानेश्वर माऊलीची असो किंवा जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी असो विविध जिल्ह्यांतील विविध राज्यांतील लोक या उत्सवात सहभागी होतात. याची दुसरी बाजू म्हणजे ज्या गावांमध्ये पालखी मुक्कामी असते. त्या गावात पालखी पुढे गेल्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरते. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २०१५ साली प्रायोगिक तत्त्वावर वारीबरोबर फिरते शौचालय उपक्रम राबविला.
या उपक्रमाला ‘निर्मलवारी’ हे नाव देण्यात आले. या उपक्रमास सुरवातीला काहीसा विरोध झाला होता. नंतर मात्र या उपक्रमाचे फायदे समोर येत गेल्यामुळे या दोन्ही पालखी सोहळ्यात आज शेकडो स्वच्छतागृहाचे युनिट केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या मदतीने उपलब्ध करून देण्यात येतात. या सर्व उपक्रमाचे जनजागृती करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करते. या युनिटला लाईट, पाणी उपलब्ध करून देऊ वारकरी मंडळींना याचा वापर करण्याची जनजागृती करण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी स्वयंसेवक म्हणून काम करतात.
पुणे जिल्ह्यातून सोहळा सुरु झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किरण ढमढेरे, माऊली कुडले व सुदर्शन चौधरी हे एक महिना अगोदर नियोजन करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळातील दोन वर्षे वगळता भारतीय जनता पक्षाचे गजानन वाकसे गेली ३ ते ४ वर्ष सणसर मुक्काम प्रमुख म्हणून त्यांच्या शेकडो स्वयंसेवकांसह वारीची सेवा करतात.