सातारा : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानुसार सातारा पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्यात आल्या. या जागा आरक्षित झाल्याचा फटका साताऱ्यातील दिग्गजांना बसल्याचे समोर आले आहे.
यामध्ये अमोल मोहिते, अशोक मोने, किशोर शिंदे, जयेंद्र चव्हाण, विजय काटवटे, सुजाता राजेमहाडिक, सिता हादगे, सुहास राजेशिर्के यांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे. तर आरक्षण सोडतीमुळे रविंद्र ढोणे, वसंत लेवे, राजू गोरे यांना मात्र लॉटरी लागली आहे. काही दिग्गजांना धक्का बसल्याचे दिसत असले तरी उमेदवारी निश्चितीवेळी त्यांचे इतर प्रभागात पुर्नवसन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग क्र. अकरा व ते वीस येथून वसंत लेवे यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. गुरुवार झालेल्या आरक्षण सोडतीने त्यांना कौल दिला. त्यामुळे दोन्ही प्रभागातून त्यांना संधी आहे. प्रभाग क्र. 11 मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे संजय लेवे यांना संधी देणार की अविनाश कदम यांना हा औत्सुक्याचा विषय आहे. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा प्रभाग सात सर्वात मोठा असताना तो खुला झाला. तिथे शेंडे यांना याच गटातून पालिकेत यावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक 14 हा खुला झाल्याने स्मिता घोडके यांना याच गटातून नशीब आजमावावे लागेल.






