मुंबईः म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जून, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
२८ जून, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता https://mhada.gov.in आणि www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने लागू आदर्श आचारसंहिता यामुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाचा दिनांक निश्चित करण्यात आला नव्हता. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने ई-लिलावाचा दिनांक व वेळ मंडळातर्फे निश्चित करण्यात आली आहे.
सदर ई-लिलावात मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींनिहाय विक्रीसाठी उपलब्ध अनिवासी गाळ्यांची संख्या पुढीलप्रमाणे :- प्रतीक्षा नगर-शीव येथील १५ दुकाने, न्यू हिंदी मिल-माझगाव ०२, स्वदेशी मिल-कुर्ला-०५, गव्हाणपाडा मुलुंड-०८, तुंगा पवई-०३, कोपरी पवई-०५, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व-०१, शास्त्रीनगर गोरेगाव-०१, सिद्धार्थ नगर गोरेगाव-०१, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व-१७, मालवणी-मालाड- ५७, चारकोप भूखंड क्रमांक एक- १५, चारकोप भूखंड क्रमांक दोन- १५ दुकाने, चारकोप भूखंड क्रमांक तीन -०४, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व -१२, महावीर नगर कांदिवली पश्चिम –१२ दुकाने.
या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे यासाठी ०१ मार्च, २०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते ०६ जून, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.