महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
मुंबई : नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालावर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. “न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्याने महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही,” असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. विधीमंडळाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा आहे. यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे. अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही! महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नसरापूर प्रकरणात आज न्याय झाल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “महायुती सरकार महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित वातावरणात जीवन जगू शकेल यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.”
नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला (वय ६५) मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यालयाने सुनावली आहे. आरोपीने भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणावर आज कोर्टाकडून महत्वाचा निकाल देण्यात आला. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण राज्यात त्याला फाशी होणार कि जन्मठेप याकडे नजरा लागल्या होत्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्याला फाशी देण्यात आली असून अखेर चिमुकलीला न्याय मिळाला. निकाल वाचन झाल्यांनतर न्यायाधीशाने आरोपीला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं आणि त्याला म्हंटल आता फासावर चढाव लागेल. अवघ्या ५५ दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला. सर्वात जलदगतीने निकाल लागणारा हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.
Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?






