देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी...; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं
महायुतीने आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून, शिफारस केली होती आणि आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे. तसं पत्र त्यांना दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात महायुतीला इतकं मोठं यश मिळालं नव्हतं. महाराष्ट्रातील जनतेने लाडका भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी आणि राज्याती प्रत्येक मतदारांनी आम्हाला भरभरून दिलं आहे. यामागे गेल्या अडीच वर्षात जे आम्ही काय तिन्ही पक्षांनी मिळून काम केलं. त्यात कोणी कमी जास्त असं नव्हतं. आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय देणार आहोत. हे म्हत्त्वाचं होतं. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं.
राज्य चालवताता आम्ही अनेक निर्णय घेतले. जे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबवण्यात आले होते. या महाराष्ट्राला १०-२० वर्ष मागे नेणारा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर तात्काळ त्या प्रकल्पांवरील बंदी उठवली आणि प्रकल्प मार्गी लावले. त्यांचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं. त्यांच्या विकासासाठी असतं, त्याचं पालन आणि नियोजन करण्याचं काम आम्ही केलं आहे. याचं खूप समाधान आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आधार म्हणून सरकारची जबाबदारी असते ती आम्ही पार पाडली आहे. या कामा नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्र्यांनी मदत केली आहे. त्याचा फायदा राज्यातील जनतेला झाला. महायुतीच्या कामांवर विश्वास ठेवून भरभरून यश दिलं. त्यामुळे खेळीमेळीच्या वातारणात सरकार स्थापन होणार आहे.
यावेळी पत्रकारांनी त्यांना उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत तुम्ही आणि अजित पवार शपथ घेणार का असा प्रश्न विचारला त्यावर शिंदे म्हणाले, थोडं थांबा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यावर अजित पवार म्हणाले, थोडी कळ काढा, त्यांचं संध्याकाळी समजेल, मी तर उद्याच शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यावर शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, अजित पवारांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, मागच्या वेळी आम्ही दोघांनी (मी व देवेंद्र फडणवीस) सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचं राहिलं होतं. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले.