राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
सातारा : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. विधानसभेसाठी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरु असून भाजपची पक्षश्रेष्ठींसोबत बोलणी सुरु आहे. त्यानंतर आता शिंदॆ गट देखील निवडणूकीच्या तयारीला लागला आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सातारा हे एकनाथ शिंदे यांचे गाव असल्यामुळे याठिकाणी शिंदे गटाने मोठी तयारी सुरु केली आहे. जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक देखील घेतली.
शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेत कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश दिले. पितृपंधरवडा संपल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची थेट संवाद यात्रा सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. स्वतः जिल्हाध्यक्ष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणांगणात उतरले असून या बैठकीतून शिवसेना कार्यकर्तांना स्फूर्ती आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रमध्ये महायुतीचे तिन्ही घटक पक्ष सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे आग्रही झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा मिळाल्यास सत्ता नक्की येईल, असा विश्वास भाजप पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील व्यक्त केला होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी आणि सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागेवर शिवसेनेचा झेंडा फडकवाण्यासाठी तयारी सुरु आहे.
शिवसैनिक प्राणपणाने सज्ज
याच दृष्टीने साताऱ्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष कामकाजात त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यांची मनोगते काय आहेत याच्यावर सविस्तर चर्चा झाली. महायुतीच्या चर्चेमध्ये शिंदे गटावर अन्याय झाल्यास जिल्ह्यातील आठही मतदारसंघांवर दावा ठोकण्याची शिंदे गटाची तयारी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना महायुतीमध्ये बळ देण्यासाठी सर्व शिवसैनिक प्राणपणाने सज्ज राहतील, अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी मांडली.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या बांधणीमध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे शिवसैनिकांनी बूथ लेवल पासून प्रामाणिकपणे काम केल्यास कोणताही विजय अवघड नाही. जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या सर्व भावना या एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सर्व शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सदस्य नोंदणी, बूथ रचना तसेच शासकीय योजनांचा प्रसार व प्रचार शिवसैनिकांनी करावा असे निर्देशित केले आहे
लाडकी बहीण योजनेचा आढावा
महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील सातारा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या संदर्भातील आढावा घेण्यात आला. लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना ठरली आहे. या माध्यमातून महिला संघटनेचे मोठे जाळे जिल्ह्यात उभे राहिले आहे. लाडक्या बहिणींना सातारा जिल्ह्यात काय अडचणी येत आहेत. शासनाने राबवलेल्या कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत, याची माहिती देण्यासाठी पितृ पंधरवड्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातून शिंदे गटाची संवाद यात्रा सुरू होईल, असे स्पष्ट संकेत पुरुषोत्तम जाधव यांनी दिले आहेत.
वाई विधानसभा मतदारसंघावर दावा
सातारा जिल्ह्याला अद्यापही दुष्काळी म्हणून शिक्का लागलेल्या खंडाळा तालुक्याचा एकही आमदार नसल्याची खंत आहे. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून लढण्याची भूमिका सोडलेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जाधव यांचा जिल्हा दौरा सुरू होणार असला तरी त्यांचे लक्ष वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघावर आहे. महायुतीच्या राजकीय तडजोडीत बऱ्याचदा त्यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे थांबावे लागले मात्र यंदा पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुक्याचे अस्मितेसाठी आक्रमक होणार हे निश्चित आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.